अमळनेर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन वादावर तोडगा काढण्याचे निर्देश..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि कामगार यांच्यात वेतन, पीएफ व इतर सुविधांबाबत सुरू असलेल्या वादावर दोन्ही पक्षांनी सन्माननीय तोडगा काढावा, असे निर्देश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त बैठकीत दिले.

बैठकीत कामगारांच्या वतीने मेहुल बिऱ्हाडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने २०२२ पासून कामगारांचा पीएफ जमा केलेला नाही, किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात नाही, तसेच वेतन बँक खात्यावर न देता साध्या वहीवर पेन्सिलीने रक्कम लिहून दिली जाते व नंतर ती खोडून टाकली जाते, असे आरोप त्यांनी केले. तसेच पीएफ दुसऱ्याच नावाने जमा होत असल्याचा आणि कामगारांना आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक किट देण्यात येत नसल्याचाही आरोप करण्यात आला.

दरम्यान ठेकेदार पवार व मुकादम खलील शहा यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, कामगारांनीच पीएफ रोखीने देण्याची मागणी केली होती. कामगार फक्त तीन तास काम करतात. आपण कमी दराने ठेका घेतला असून चार वर्षांपासून मुदतवाढ देऊन त्याच दरात काम करण्यास सांगितले जात आहे. तसेच बिलही प्रलंबित असूनही कामगारांना नियमित वेतन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर कामगार आक्रमक होत करारानुसार किमान वेतन देणे, वेतन थेट बँक खात्यावर जमा करणे तसेच २०२२ पासूनचा पीएफ जमा करण्याची मागणी त्यांनी केली.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दोन्ही पक्षांची समजूत काढत सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी दोन पावले मागे घेत शहराला वेठीस धरू नये, अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर दोन्ही गटांनी आपापसात चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीस आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार व कामगार उपस्थित होते.
