महिलांना समान हक्कांसोबत सन्मानही मिळाला पाहिजे – प्रा. डॉ. नयना नवसारीकर..
अमळनेर : आबिद शेख
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राहकतीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

तसेच सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा स्वर्गीय डॉ. अपर्णा मुठ्ठे यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अमळनेरच्या अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. नयना नवसारीकर उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, महिलांना केवळ सहानुभूती नको, तर समान हक्क, अधिकार आणि सन्मान मिळाला पाहिजे. स्त्री ही आयुष्यात अनेक भूमिका पार पाडत असते—मुलगी, भगिनी, पत्नी आणि नंतर आई म्हणून ती कुटुंबाची जबाबदारी सांभाळते.

आजच्या प्रगत काळातही महिला घरकाम, स्वयंपाक आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत पुरुषांनीही घरकामात सहभाग घेणे आवश्यक आहे. पती-पत्नी दोघांनी मिळून घर संसार आनंदाने चालवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील हिने महिला दिनानिमित्त प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रांत महिला आयाम प्रमुख अॅड. भारती अग्रवाल, सौ. वनश्री अमृतकर, सौ. उर्मिला अग्रवाल, सौ. कपिला मुठ्ठे, सौ. अंजू ढवळे, सौ. मेहराज हुसेन यांच्यासह जिल्हास्तरीय पदाधिकारी मकसूद बोहरी, सतीश देशमुख, विजय शुक्ला, सुनील वाघ, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ पाटील तसेच निवृत्त तहसीलदार उपासनी साहेब यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. कपिला मुठ्ठे यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय अॅड. भारती अग्रवाल यांनी करून दिला. शेवटी सौ. स्मिता चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

