आखाती देशांतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस सिलिंडर दरवाढ, घरगुती ६० तर व्यावसायिक ११५ रुपयांनी महाग..

0
New-Doc-03-09-2026-09.36.jpg


24 प्राईम न्यूज 9 मार्च 2026
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून होणाऱ्या गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याने भारतात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून ७ मार्चपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
नवीन दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर तब्बल ११५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर महागल्याने हॉटेल आणि खानावळीतील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


याशिवाय गॅस सिलिंडरच्या बुकिंगवरही मर्यादा घालण्यात आली असून नागरिकांना आता २१ दिवसांनंतरच पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे. केवळ सिलिंडरच नव्हे तर पाईपलाईनद्वारे पुरवठा होणाऱ्या घरगुती आणि व्यावसायिक पीएनजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. या मार्गातून होणाऱ्या गॅस व इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन व गॅस तुटवड्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतामध्ये सध्या गॅस आणि इंधनाचा पर्याप्त साठा उपलब्ध असला तरी युद्ध लांबल्यास दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed