साने गुरुजी विद्यामंदिरची शैक्षणिक सहल संपन्न. जळगाव–हैदराबाद विमान प्रवासाचा विद्यार्थ्यांनी घेतला अविस्मरणीय अनुभव..
अमळनेर /आबिद शेख
शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक सहलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. सहल जर थेट विमानातून असेल, तर तो अनुभव आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरतो.

असाच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेने राबविला. यंदा प्रथमच जळगाव ते हैदराबाद असा विमान प्रवासासह शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.

विमानातून सहलीचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. त्यामुळे सहलीचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिला टप्पा २४ ते २८ फेब्रुवारी, तर दुसरा टप्पा ४ ते ८ मार्च दरम्यान यशस्वीरीत्या पार पडला
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाचा थरार आणि आनंद अनुभवला. जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ (Fly91) या विमानाने विद्यार्थ्यांनी हैदराबादकडे उड्डाण केले. बहुतेक विद्यार्थ्यांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. विमानतळावरील प्रक्रिया, सुरक्षा तपासणी आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव विद्यार्थ्यांनी जवळून घेतला.
हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये चारमिनार आणि गोलकोंडा किल्ला येथे स्थापत्यकला व इतिहासाची माहिती जाणून घेतली. सालार जंग संग्रहालयातील विविध कलावस्तू आणि प्राचीन वारसा पाहून विद्यार्थी प्रभावित झाले. तसेच नेहरू प्राणी संग्रहालयात विविध प्राणी-पक्ष्यांचे निरीक्षण करून जैवविविधतेचा अभ्यास केला.
याशिवाय हुसेन सागर येथे बोट सफारी आणि लुंबिनी पार्कमधील लेझर शोचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. तसेच रामोजी फिल्म सिटी येथे चित्रपटातील दृश्यांचे चित्रीकरण कसे केले जाते आणि पडद्यावर ते कसे सादर केले जाते याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांना रिअल आणि रील जगातील फरक समजून घेण्याची संधी मिळाली.
विमान कंपनीकडूनही विद्यार्थ्यांचे कौतुक
या शैक्षणिक सहलीची दखल फ्लाय ९१ (Fly91) या विमान कंपनीनेही घेतली. जळगाव विमानतळावर विद्यार्थ्यांचा सामूहिक फोटो काढून कंपनीने सहलीचा आनंद द्विगुणित केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार केल्याबद्दल विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला कॉमिक्स भेट देण्यात आली. या संस्मरणीय क्षणांचे फोटो कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले.
शिस्तबद्ध नियोजनामुळे सहल यशस्वी
शाळेच्या शिक्षकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहलीचे नियोजन केले होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना केवळ वर्गातच शिक्षण न देता त्यांना बाह्य जगाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि संस्कृतीचा अनुभव मिळावा यासाठी साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.
या उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले आहे. सहलीचे नियोजन संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक मनोज पाटील, महेंद्र रामोशे, पंडित क्षीरसागर, मोनिका पाटील, मालती पवार, मुरलीधर मगरे, रवींद्र कोळी, राहुल पाटील, सूर्यकांत पाटील, सुनीता पाटील आणि सुवर्णा पाटील यांनी सहलीचे नियोजन व व्यवस्थापन केले.

