“डोक्यावरचे कर्ज फेडण्यासाठीच का पालिका ताब्यात घेतली?” – आमदार अनिल पाटील यांचा माजी आमदार शिरीष चौधरींना  सवाल…

0
New-Doc-05-29-2025-06.25.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपालिकेतील विकासकामे केवळ कमिशनसाठी थांबवली जात असल्याचा गंभीर आरोप करत आमदार अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“तुमच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले आहे, तुमची प्रॉपर्टी विकायला निघाली आहे. ते कर्ज फेडण्यासाठीच अमळनेरकरांनी पालिका तुमच्या ताब्यात दिली काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, अमळनेर येथील स्मशानभूमीतील वाढती गरज लक्षात घेऊन नवीन दहन शेड मंजूर करून त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले होते. मात्र नगरपालिकेत सत्ता बदलल्यानंतर ठेकेदाराला बिल अदा न केल्यामुळे अंतिम टप्प्यात असलेले काम थांबविण्यात आले. त्यामुळे अंत्यविधी बाहेर जमिनीवर करावे लागत असून मृतदेहांची विटंबना होत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. केवळ कमिशनसाठी काम थांबविणे म्हणजे “मेलेल्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार” असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.


याशिवाय, मोठ्या प्रयत्नांनी मंजूर करून आणलेली २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना तसेच शहरातील विविध रस्त्यांची कामेही कमिशनच्या कारणावरून थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “आतापर्यंत एकही मोठे विकासकाम आणता आले नाही, आणि आम्ही पालिकेच्या माध्यमातून मंजूर केलेली कामेही जाणीवपूर्वक अडवली जात आहेत,” असे पाटील म्हणाले.
नगरपालिका ताब्यात असल्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे ठेकेदारांची बिले काढून मोठे कमिशन पदरात पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, या प्रकाराविरोधात आपण विधानसभेत आवाज उठविणार असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार आहोत. पाणीपुरवठ्यासह रोजंदारी कर्मचाऱ्यांची बिले का थांबवली जात आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“माणसाच्या मृत्यूतही कमाईचे गणित?”
दरम्यान, अंत्यविधीसाठी नगरपालिकेकडून लाकडाऐवजी मोफत गौरी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड मोफत दिले जात होते आणि त्याचा खर्च अंदाजे ३०० ते ५०० रुपये इतका होता. मात्र आता त्याच सरणासाठी सुमारे ५ हजार रुपयांचा ठराव करण्यात आल्याची चर्चा आहे.
“३०० ते ५०० रुपयांच्या सरणाचा खर्च थेट ५ हजार कसा झाला? ही जनतेच्या कराच्या पैशांची लूट नाही का?” असा सवाल उपस्थित करत आमदार पाटील यांनी या निर्णयामागे आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. खाजगी ठिकाणी गौरीद्वारे अंत्यसंस्कार करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो, मात्र नगरपालिकेकडून त्यापेक्षा जास्त दर ठरविणे हे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.
“माणसाच्या मृत्यूतही जर कमाईचे गणित मांडले जात असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी?” असा सवाल करत या निर्णयाबाबत माजी आमदारांनी जनतेसमोर खुलासा करावा, असे आवाहनही आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed