महिला दिनानिमित्त कळमसरे येथे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान..
आबिद शेख/अमळनेर
कळमसरे (ता. अमळनेर) : ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कळमसरे येथे सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने विविध शासकीय विभागात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत शासकीय सेवेतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आयुष्यातील दुहेरी भूमिका प्रामाणिकपणे व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
यावेळी सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या अमळनेर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, महिला पोलीस नम्रता जरे आणि मोनिका पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील नर्सिंग अधिकारी अर्चना चंद्रकांत ढाले यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल दिनेश माळी यांच्या हस्ते सन्मानित महिलांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
