फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा..
नांदेड (प्रतिनिधी) : फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सेवा केंद्राच्या संचालिका बीके अनिता बहनजी व बीके सत्यवती बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सेवेनिवृत्त मुख्याध्यापिका सौ. उषाताई जाधव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. सौ. कल्पना जाधव यांनी महिला दिनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांना संधी दिल्यास त्या पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम कार्य करू शकतात, याची अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात.
यावेळी सौ. उषाताई जाधव यांनीही महिलांच्या सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमात बीके अनिता बहनजी, बीके सत्यवती बहनजी आणि सौ. उषाताई जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना संचालिका बीके अनिता बहनजी यांनी सांगितले की, परमपिता शिव परमात्म्याचे वारस ब्रह्मा बाबा यांनी संस्थेची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर सोपवली आणि आजपर्यंत ब्रह्माकुमारींच्या ज्येष्ठ दाद्यांनी व दिदींनी ती समर्थपणे पार पाडली आहे. यावरून महिलांची क्षमता व जबाबदारी पार पाडण्याची ताकद सिद्ध होते.
यानंतर महिला दिनानिमित्त खास तयार करण्यात आलेल्या केकचे कटिंग करण्यात आले. शिव परमात्म्याच्या चिंतनानंतर टोली (प्रसाद) वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला फरांदे पार्क व परिसरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कल्पना जाधव यांनी केले.

