अमळनेर नगरपरिषदेचा दिलासा; मालमत्ता हस्तांतरण शुल्कात मोठी कपात..

0
New-Doc-03-07-2026-23.02.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अमळनेर नगरपरिषदेने मालमत्ता हस्तांतरण (फेरफार) शुल्कात मोठी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.

शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अनेक मालमत्ताधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नगरपरिषदेने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार खरेदी-विक्री दस्ताऐवजावरून होणाऱ्या मालमत्ता हस्तांतरणासाठी यापूर्वी खरेदी मूल्याच्या २ टक्के शुल्क आकारले जात होते. आता त्यात निम्मी कपात करून केवळ १ टक्का शुल्क आकारले जाणार आहे. तर दस्ताऐवजाशिवाय होणाऱ्या हस्तांतरणासाठी, जसे की वारस नोंद, यासाठी रु. १,५०० इतका निश्चित दर ठेवण्यात आला आहे.


नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर नगरपरिषदेच्या दप्तरी त्या मालमत्तेची नोंद आपल्या नावावर करणे आवश्यक असते. यापूर्वी शुल्क जास्त असल्यामुळे अनेकांनी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. मात्र आता शुल्क कमी झाल्याने नागरिकांचा आर्थिक भार कमी होणार असून अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
ज्या नागरिकांच्या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा वारस नोंद अद्याप प्रलंबित आहे त्यांनी तातडीने नगरपरिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधून अधिकृत हस्तांतरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्षांकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच नगरपरिषदेच्या नोंदीही अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed