समाजसेवेत आयुष्य अर्पण करणाऱ्या डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ तथा समाजसेविका स्व. डॉ. अपर्णा मुठ्ठे यांचे २ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अमळनेर शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्य विशेषत्वाने आठवले जात आहे. मुंबई येथे माहेर असलेल्या डॉ. अपर्णा मुठ्ठे या अमळनेरच्या प्रसिद्ध मुठ्ठे कुटुंबातील स्नुषा होत्या. आपल्या मेहनती, शिस्तप्रिय स्वभाव आणि समाजकार्यासाठीच्या जिद्दीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. हजरजबाबी स्वभाव, चेहऱ्यावर सतत असणारे स्मितहास्य आणि सर्वांशी आपुलकीने वागण्यामुळे त्या अनेकांसाठी ताई, बहीण किंवा आईसमान बनल्या होत्या.

महिलांसाठी जिम व विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका
अमळनेर शहरात महिलांसाठी स्वतंत्र लेडीज जिम तसेच विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम त्यांनी पुढाकार घेऊन राबवला. अमळनेर नगर परिषद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम उभारण्यात आला. आज अनेक महिला व विद्यार्थिनी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
अमळनेर महिला मंच ट्रस्टची स्थापना
महिलांना संघटित करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी अमळनेर महिला मंच ट्रस्टची स्थापना केली होती. गेल्या पाच वर्षांपासून त्या या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. या मंचाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात.
दरवर्षी जानेवारी महिन्यात शिवाजी नाट्यगृह परिसरात महिलांसाठी विविध वस्तूंचे स्टॉल आयोजित करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात येत असे. पापड, लोणचे, मसाले, झुणका-भाकर, पुरणपोळी तसेच विविध हस्तकला वस्तूंची विक्री करून अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला. यासोबतच नृत्य, गायन, एकांकिका, निबंध व चित्रकला स्पर्धा घेऊन महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ दिले जात होते.
सर्वधर्म परिषद : सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न.

२०२४ मध्ये अमळनेर महिला मंचतर्फे शहरात सर्वधर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. शहरात सामाजिक सलोखा कायम राहावा आणि सर्व धर्मांमध्ये बंधुभाव वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, सिंधी आणि बौद्ध समाजाच्या धर्मगुरूंना एकत्र आणून त्यांनी समाजात एकतेचा संदेश दिला. हा कार्यक्रम राज्यभर आदर्श ठरेल असा यशस्वी ठरला.
भिल्ल समाजातील मुलांसाठी शाळा
सुमारे २५ वर्षांपूर्वी भिल्ल वस्तीत राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेत रोटरी अॅन्स प्राथमिक शाळा सुरू करण्यास मदत केली. आजही ही शाळा कार्यरत असून अनेक मुलांचे शिक्षण सुरू आहे.
वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजकार्य
डॉ. अपर्णा मुठ्ठे या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्यांचे पती स्व. डॉ. चंद्रशेखर मुठ्ठे यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उपचार दिले. दर आठवड्याला संत सखाराम महाराज मठ तसेच विविध गावांमध्ये जाऊन आरोग्यसेवा देण्याचे कार्य त्यांनी केले.
पतीच्या निधनानंतरही त्यांनी समाजसेवेची परंपरा खंडित होऊ दिली नाही. त्यांचे सुपुत्र डॉ. राहुल मुठ्ठे, सुपुत्री डॉ. गौरी जोशी (पुणे) आणि स्नुषा डॉ. बिराज मुठ्ठे हेही समाजसेवेचा वारसा पुढे नेत आहेत.
विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग
डॉ. मुठ्ठे या अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय होत्या. एव्हरग्रीन सीनियर सिटीजन क्लब, ब्राह्मण सेवा संघ, पोलीस दक्षता समिती तसेच हास्य क्लब यामध्ये त्यांचा सहभाग असे. सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्या उत्साहाने भाग घेत असत.
त्यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुठ्ठे कुटुंबियांच्या दुःखात अमळनेरकर सामील असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.
— मकसूद बोहरी, अमळनेर
