अमळनेर मध्ये वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम; ७० ग्राहकांवर कारवाई..

अमळनेर /आबिद शेख. अमळनेर येथील महावितरणच्या अमळनेर उपविभाग-१ अंतर्गत शहर व परिसरातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटर व वायरिंगची तपासणी करण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली आहे.

या तपासणीत घरगुती ६५ व व्यावसायिक ५ असे एकूण ७० ग्राहक वीज चोरी करत असल्याचे आढळून आले. या ग्राहकांनी मिळून अंदाजे ५७,७०० युनिट वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत गलवाडे रोड परिसरातील काही व्यावसायिक ग्राहकांचाही समावेश असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणतर्फे पुढील काळातही अशा प्रकारच्या वीज चोरीविरोधी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत वीज कनेक्शन घेऊनच वीज वापर करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.
ही धडक मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून वीज चोरी शोध मोहीम प्रभावीपणे राबवली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

