एसटी चालक-वाहकांची ‘अल्को टेस्ट’ सक्तीची; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम..

0
New-Doc-03-06-2026-09.30.jpg


आबिद शेख/अमळनेर
राज्य परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची दररोज अल्को टेस्ट मशीनद्वारे मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


चालक व वाहकांनी मद्यपान केलेले नाही याची खात्री करूनच त्यांना कर्तव्यावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीवर कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक तसेच वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनी नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


बस कार्यावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालक-वाहकांनी नोंद केल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा अल्को टेस्ट करून योग्य नोंदी घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्यात येणार आहे. स्थानक प्रमुखांनीही याची खात्री करूनच वाहन मार्गस्थ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कडक भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गुरुवारी २५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील पनवेल बसस्थानकाला अचानक भेट दिली असता काही धक्कादायक प्रकार आढळून आल्यानंतर ही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed