आखाती युद्धाचा फटका; केळी-द्राक्ष-कांदा उत्पादकांना क्षेत्रनिहाय अनुदान द्या – अमळनेर तालुका काँग्रेसची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत असून विशेषतः केळी, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लागवडीच्या क्षेत्रावर अनुदान मंजूर करावे, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे.


यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अमेरिका व इस्रायल विरुद्ध इराण असा संघर्ष सुरू असून या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम जगभरातील व्यापारावर होत आहेत. भारतातील जळगाव व नाशिक जिल्ह्यांमधील केळी, द्राक्ष, कांदा तसेच भाजीपाला व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला आहे

सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे आखाती देशांकडून केळी व द्राक्षांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या काळात या फळांना चांगला दर मिळत असतो. मात्र युद्ध परिस्थितीमुळे निर्यातीसाठी बंदरांवर पाठविण्यात आलेले केळी, द्राक्ष व भाजीपाल्याचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचा माल वेळेत निर्यात होऊ शकत नसल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने माल खरेदी करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रतिक्विंटल सुमारे २५०० रुपये दराने विकली जाणारी केळी सध्या अवघ्या १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने मागवली जात आहे. द्राक्ष व कांद्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. केळी, द्राक्ष, कांदा व भाजीपाला ही पिके नाशवंत असल्यामुळे ती दीर्घकाळ साठवून ठेवणे शक्य नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर केळी, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीच्या क्षेत्रावर अनुदान मंजूर करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. तसेच आखाती देशांमध्ये विमान सेवा खंडित झाल्याने भारतासह इतर देशांतील व्यापारी, खेळाडू, पर्यटक व विद्यार्थी अडकले असल्याची बाब लक्षात घेऊन त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मनोज पाटील, संदीप घोरपडे, पी. वाय. पाटील, प्रा. श्याम पवार, मगन वामन पाटील, बन्सीलाल भागवत, भगवान संधान शिव, के. व्ही. पाटील, हर्षल जाधव, कैलास पाटील, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पितांबर पाटील, सईद तेली, कुशल मिस्तरी, सुरेश लहू पाटील, विजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
