उघड्या गटारी, कचऱ्याचे ढीग अन् बंद दवाखाना; पैलाडकरांचा संताप उसळला“आम्ही अमळनेरचे करदाते नागरिक नाही का?” — प्रशासनावर सवाल.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर शहरातील पैलाडसह परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः पैलाड भागातील पांढरी परिसर (वॉर्ड क्र. ११) येथे उघड्या गटारी, साचलेले सांडपाणी, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि भग्न अवस्थेतील सार्वजनिक सुविधा यामुळे नागरिक त्रस्त झाले असून संताप व्यक्त करत आहेत.

उघड्या गटारींमध्ये प्लास्टिकचा खच; डासांचा प्रादुर्भाव
पांढरी परिसरात ‘कचरा टाकू नये’ असा फलक लावण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी कचऱ्याचा डेपोच तयार झाला आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या उघड्या गटारींमध्ये प्लास्टिक व बांधकामाचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. परिणामी दुर्गंधीचा त्रास असह्य झाला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अमळनेर–पारोळा या वर्दळीच्या रस्त्यालगत असलेली मुख्य गटार पूर्णपणे सांडपाणी, गाळ आणि प्लास्टिकने भरली आहे. काटेरी झुडपे गटारीवर झुकली असून उकिरड्यावर मेलेली जनावरे पडलेली दिसून आली. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहाची दैना
महिला व पुरुषांसाठी उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह पाणी व वीज नसल्यामुळे पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. पुरुषांच्या स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले असून परिसरात गवत व झुडपे वाढलेली आहेत. भिंतींची रंगसफेदी उखडलेली असून आजूबाजूला कचरा व शेणाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
२० वर्षांपासून बंद आयुर्वेदिक दवाखाना
पैलाड भागातील शिवाजीनगर चौकातील नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना तब्बल २० वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. जीर्ण इमारत, गंजलेले दरवाजे आणि तडे गेलेल्या भिंती यामुळे पालिकेच्या मालमत्तेची हानी होत आहे. लहानसहान उपचारांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असून ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
८० फुटी रस्ता झाडांच्या विळख्यात
पैलाडच्या मागील बाजूस असलेला ८० फुटांचा रस्ता झाडांच्या विळख्यात अडकला आहे. गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचते. त्यामुळे चिखल, दुर्गंधी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अंगणवाडी भाड्याच्या खोलीत
पैलाड भागातील अंगणवाडीची मूळ इमारत भग्न झाल्याने सध्या भाड्याच्या खोलीत अंगणवाडी सुरू आहे. पालिकेने डागडुजी करून ती इमारत वापरण्यायोग्य करावी, तसेच मुलांसाठी छोटा बगिचा उभारावा, अशी मागणी होत आहे. प्राथमिक शिक्षणाची समाधानकारक सोय नसल्याने काही पालकांना खासगी शाळांचा पर्याय निवडावा लागत आहे.
जनआंदोलनाचा इशारा
याबाबत नगरसेवक विजय कहारू पाटील यांनी सांगितले की, “मी वारंवार आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र ठोस प्रतिसाद मिळत नाही. मी विरोधी गटात असल्यामुळे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, अशी शंका निर्माण होते. सर्व नागरिक करदाते आहेत. पालिकेने समान सुविधा द्याव्यात. अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल.”
प्रशासनाची भूमिका
स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे यांनी सांगितले की, “शिवाजीनगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. स्वच्छतागृहाची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल. पारोळा रस्त्याकडील नाला जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येईल. आठ दिवसांत कामे पूर्ण करण्यात येतील.”
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले की, “साफसफाईबाबत बैठक घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाठवून स्वच्छता व आवश्यक दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील. मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवर नोटीस व दंडात्मक कारवाई केली जाईल.”
आता प्रश्न एकच…
घोषणांपुरतेच आश्वासन राहणार की प्रत्यक्ष कृती होणार?
पैलाडकरांना घाणीच्या, दुर्गंधीच्या आणि भग्नावस्थेच्या दुष्टचक्रातून सुटका केव्हा होणार?
प्रशासनाने युद्धपातळीवर कारवाई करून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे.

