फवारणी की विषवर्षाव? अमळनेर पालिकेचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर…
आबिद शेख/ अमळनेर.

अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील गंभीर बेफिकिरीचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, मुदत संपलेली (एक्स्पायरी) बीएचसी पावडर व इतर केमिकल्स शहरात सर्रास फवारले जात असल्याचे समोर आले आहे.

नागरिकांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच आता नागरिकांसह स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
पालिकेकडून वापरण्यात येणाऱ्या केमिकल्सचे पॅकिंग 2023 मधील असून त्यांची मुदत 2024 मध्येच संपलेली आहे. तरीदेखील हेच केमिकल्स शहरात फवारले जात असल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही बीएचसी पावडरच्या थैल्यांवर उत्पादन तारीख असली तरी स्पष्ट एक्सपायरी डेटच नमूद नसल्याचेही आढळून आले आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनीही एक्सपायरी मटेरियल वेळेत नष्ट करण्यात आले नसल्याची कबुली दिली आहे.
गोदामात ‘मृत’ केमिकल्सचा साठा!
नगरसेवक डॉ. डिगंबर महाले व भरत ललवाणी यांनी सोमवारी (दि. 2 मार्च) सिंधी कॉलनी येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान बीएचसी पावडरची संशयास्पद थैली पाहिली. त्यावर उत्पादन व एक्सपायरी तारीख स्पष्ट नसल्याने त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
मुख्याधिकारी गणेश शिंदे व आरोग्य निरीक्षक कंडारे यांनी रजेवर असल्याचे सांगत जबाबदारी टाळल्याचा आरोप आहे.
यानंतर डॉ. महाले व ललवाणी यांनी थेट पालिकेच्या आरोग्य विभागाचे गोडावून गाठले असता मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी केमिकल्स
निकृष्ट दर्जाचे झाडू वापरात नसलेले डस्टबिन
अन्य साहित्य साठवून ठेवलेले आढळले.
कर्मचाऱ्यांचीही नाराजी
सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार:
झाडू उपलब्ध नसल्याची तक्रार केली जाते
मात्र गोदामात मोठ्या प्रमाणावर साठा आहे
दिले जाणारे झाडू दोन दिवसही टिकत नाहीत
डस्टबिनही उपलब्ध करून दिले जात नाहीत
म्हणजेच साहित्य आहे — पण वापरण्यायोग्य नाही!
❓ जवाबदारी कोणाची?
पालिकेतील सत्तांतराला दोन महिने उलटले तरी आरोग्यासारख्या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
प्रश्न उपस्थित होत आहेत:
एक्सपायरी केमिकल्स वापरण्याचे आदेश कोणी दिले?
डिस्पोज प्रक्रिया का राबवली नाही?
अतिरिक्त माल का मागवला?
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई होणार का?
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
संतोष जाधव, आरोग्य निरीक्षक:
गोदामात जुने व एक्सपायर साहित्य असल्याचे मान्य. नवीन केमिकल्ससाठी मागणी केली आहे.
प्रशांत निकम, उपनगराध्यक्ष:
प्रत्यक्ष पाहणी करून योग्य कारवाई करू.
डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष:
पूर्वीच्या पुरवठ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होईल.
जनतेच्या जीवाशी खेळ — कठोर कारवाईची मागणी
नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले:
“लोकांच्या कराच्या पैशातून फवारणी केली जाते. जर निकृष्ट व मेलेले केमिकल्स वापरले जात असतील तर हा थेट जीवाशी खेळ आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
नगरसेवक भरत ललवाणी यांनीही संबंधितांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.
आरोग्याच्या नावाखाली मृत फवारणी — चौकशीची गरज
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना, साथीचे रोग टाळण्यासाठी केली जाणारी फवारणीच धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

