पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक; सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश..

0
New-Doc-03-02-2026-06.52.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर | पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून येथील एका केळी व्यापाऱ्याची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमळनेर न्यायालयाने सात आरोपींविरुद्ध जादूटोणा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


अमळनेर येथील आसिफ छोटू बागवान हे केळी व्यापारी असून व्यापाराच्या निमित्ताने ते संभाजीनगर व अजिंठा येथे ये-जा करत होते. याच दरम्यान त्यांची ओळख शेख मुजाहिद शेख मुकीत, अकबर मकबूल मेवाती, अब्दुल मुक्कीम अब्दुल खालिफ शेख, प्रकाश गायकवाड, नंदू जाधव, शाहरूख अब्दुल मुकीत व फिरोजखा भिकनखा मेवाती यांच्याशी झाली.


या सर्वांनी आसिफ बागवान यांना विश्वासात घेत पैसे दुप्पट करून देण्याचा दावा केला. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, मात्र १७ डिसेंबर २०२२ रोजी आरोपींनी त्यांच्या घरी कथित पूजा विधी करून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी आसिफ यांनी पत्नीचे दागिने विकून व इतर ठिकाणाहून व्यवस्था करून एकूण ११ लाख रुपये दिले.
आरोपींनी पूजा धोकादायक असल्याचे सांगून आसिफ यांना घराबाहेर पाठवले. दरम्यान खोलीत धूर करून खऱ्या पैशांच्या जागी बनावट नोटांचे बंडल ठेवण्यात आले व खरे पैसे आरोपींनी लपवून ठेवले.
यानंतर आसिफ यांना नोटांवर तांदूळ टाकून मंत्र म्हणण्यास सांगण्यात आले. काही वेळाने आरोपी त्यांना धुळे रोडवर सोडून गेले. नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे उघड झाले.
बनावट मालमत्ता व धनादेशाचा देखील फसवा डाव
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मुकुंदवाडी येथील ५ लाख रुपयांची मालमत्ता व ६ लाख रुपयांचा धनादेश देण्याचे प्रतिज्ञापत्र दिले. त्यामुळे त्या वेळी गुन्हा दाखल झाला नाही.
मात्र नंतर मालमत्ता व धनादेश दोन्ही बनावट असल्याचे समोर आले.
यानंतर आसिफ बागवान यांनी अ‍ॅड. सलमान शाह यांच्यामार्फत अमळनेर न्यायालयात धाव घेतली.
उपलब्ध पुरावे व पोलिस अहवालाच्या आधारे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायालयाने सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच जादूटोणा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed