उदयनगर गावाचे भावी नेतृत्व चेतनदादा वाघ यांचा पुण्यात सत्कार..

0
New-Doc-03-01-2026-19.52.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर:-क्षत्रिय किराड समाजाच्या वतीने उदयनगर गावाचे तरुण नेतृत्व चेतनदादा वाघ यांचा पुणे येथे जाहीर सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा उदयनगर गावासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
या कार्यक्रमास
विशाल किराळ (महामंत्री, अखिल भारतीय किराळ समाज),

रतनजी घनश्याम किराळ (अध्यक्ष, पुणे टिंबर असोसिएशन व सचिव, किराड समाज पुणे),
श्री.गणेश बिडकर (सभागृह नेते पुणे मनपा)
तसेच विशालदादा धनवडे (नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, पुणे मनपा)
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच इतर नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना चेतनदादा वाघ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून केली. त्यांनी सांगितले की, “महाराजांनी स्वराज्य उभारताना लोकांच्या मनात स्वाभिमान, शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवली. आपणही आपल्या गावात,परिसरात आणि शहरात तीच जबाबदारी अंगीकारली तर विकास आपोआप घडेल.”
चेतनदादांनी नमूद केले की, आज त्यांना मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण गाव,समाज आणि कुटुंबियांचा आहे. “मी आज ज्या पदावर पोहोचलो आहे किंवा जे कार्य करत आहे, त्यामागे माझ्या गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या संस्कारांची शिदोरी आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे,” असे ते म्हणाले.


युवकांना उद्देशून त्यांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग व समाजकार्य या क्षेत्रांत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. समाज संघटित आणि एकजूट असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत व करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला.
‘स्मार्ट शहर’ संकल्पनेवर बोलताना चेतनदादांनी स्पष्ट केले की, स्मार्ट शहर म्हणजे केवळ मोठ्या इमारती किंवा प्रकल्प नव्हेत, तर सजग व जबाबदार नागरिक. स्वच्छता, वाहतूक शिस्त, पाणी व वीज बचत, ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि पर्यावरण संवर्धन या बाबींमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यावश्यक आहे. “स्वच्छता हीच खरी देशभक्ती आहे. घरापासून सुरुवात केली तरच शहर बदलेल,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
नेतृत्व म्हणजे पद नव्हे, तर जबाबदारी असल्याचे सांगत पारदर्शक,लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीने समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून गाव व समाजाच्या विकासासाठी काम करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी चेतनदादांनी समस्त क्षत्रिय किराड समाजाचे उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

हा सत्कार केवळ सन्मान नसून समाजासाठी अधिक जबाबदारीने, निष्ठेने आणि दूरदृष्टीने कार्य करण्याची नवी प्रेरणा ठरल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed