धुळीच्या त्रासाने नागरिक संतप्त; जळोद–अमळगाव रस्त्यावर मनसेचे रास्ता बंद आंदोलन..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील जळोद–अमळगाव रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे उडणाऱ्या प्रचंड धुळीने परिसरातील नागरिक हैराण झाले असून, या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित कंत्राटदाराकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अमळनेर तालुका अध्यक्ष अधिकार पाटील (बापू टेलर) यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रास्ता बंद आंदोलन छेडले. रस्त्याच्या कामादरम्यान पाणी न मारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ उडत असून, याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी केल्या. मात्र प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. “काम सुरू आहे”, “लवकरच उपाययोजना करू” अशा आश्वासनांवरच वेळ काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
यामुळे संतप्त नागरिकांनी मनसेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून रास्ता बंद करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
