पारदर्शकतेकडे पाठ? – अमळनेर न.पा. सभेच्या थेट प्रक्षेपणाच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांची मौन भूमिका..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : विद्यमान नगरसेवकांच्या निवडीनंतर अमळनेर नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या सभेत तब्बल ३० विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये नगरपालिका शाळा क्र. १ च्या जागेत १०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा महत्त्वाचा विषय मंजूर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर तर प्रशासनाकडून मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा
सभेत विरोधी गटाकडून नगरसेवक राजू दादा फापोरेकर, डॉ. डिगंबर महाले, शोभाबाई गढरे, गोपी कासार, प्रा. योगिता सयाजीराव पाटील, कापडणेकर व स्वप्ना विक्रांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवर आपली बाजू ठामपणे मांडली. काही काळ गटनेत्या जयश्रीताई याही चर्चेत सहभागी झालेल्या दिसल्या.
सत्ताधाऱ्यांचा सहभाग
सत्ताधारी गटाकडून पंकज चौधरी, श्रीराम चौधरी, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, दादा पवार, अबू महाजन व स्वाती सुरजसिंग परदेशी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
‘नमो उद्यान’ आणि योगा हॉल चर्चेत
सभेत ‘नमो उद्यान’ या विषयावरही चर्चा झाली. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी योगा हॉल संदर्भात माहिती दिली.
घंटागाड्यांच्या नोंदणीचा मुद्दा
नगरपालिकेकडे २१ घंटागाड्या असून त्यापैकी ३ गाड्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नव्याने घेतलेल्या ४ घंटागाड्यांचे वर्षभरात साधे रजिस्ट्रेशनही झाले नसल्याबाबत शिवसेना गटनेते पंकज चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित कंत्राटदार मयूर वाटतो याच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
थेट प्रक्षेपणाची मागणी डावलली?
सभागृहातील बैठकींचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करून द्यावे तसेच पत्रकारांना वार्तांकनासाठी स्वतंत्र बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी यापूर्वी नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदनाद्वारे केली होती.
मात्र पारदर्शक कारभारासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही मागणी सत्ताधारी गटाकडून विचारात घेतली गेल्याचे सभेत दिसून आले नाही.
पहिल्याच सभेत महत्त्वाचे विकासकामांचे निर्णय झाले असले तरी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे चित्र दिसून आले.
