मिरची हल्ला करून साडेपाच लाखांची लूट; आरोपी धुळे येथील असल्याचे निष्पन्न..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – शहरात दिवसाढवळ्या धाडसी पद्धतीने मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याला लुटण्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावर घडली. या प्रकरणातील आरोपी धुळे येथील असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, त्यांनी पैशांचा वाटा करून फरार झाल्याची माहिती आहे.

बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. यावेळी तोंडाला मास्क लावून मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला आणि लगेच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोठारी गोंधळले असताना त्यांच्या जवळील सुमारे साडेपाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी खाली पडली. चोरट्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती पिशवी उचलली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव आणि निलेश मोरे यांच्या पथकाला आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.
शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले असता तीनही आरोपींची हालचाल कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. तपासात आरोपी पिंपळे रस्त्याने मंगरूळ मार्गे पसार झाल्याचे समोर आले. अवघ्या एका तासात पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला असता ते धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आरोपींच्या घरापर्यंत पोहोचले; मात्र त्याआधीच त्यांनी लुटीतील पैशांचा वाटा करून फरार झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
