निम्न तापी प्रकल्पाला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी. आमदार अनिल पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंतीपत्र..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : निम्न तापी प्रकल्प पाडळसे (ता. अमळनेर) या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्र्यांकडे विनंतीपत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बहुपयोगी प्रकल्प आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील तब्बल ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासोबतच १७.१ टीएमसी पाणी साठवण क्षमता निर्माण होणार असून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी दिवंगत अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून डिसेंबर २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने ४ हजार ८९० कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर प्रकल्पास आवश्यक वैधानिक मान्यता मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. राज्याच्या आर्थिक सहभागाची हमी मिळवून देण्यात त्यांच्या भूमिकेमुळेच प्रकल्प पुढे सरकला.
यानंतर प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यात आला, ज्यामुळे केंद्रस्तरावरही त्याला गती मिळाली. या महत्वाकांक्षी योजनेचे जलपूजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे ते शक्य झाले नाही.
त्यांच्या योगदानाची दखल घेत प्रकल्पाला
“अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव”
असे नाव देण्यास शासनाने मान्यता द्यावी, अशी भावनिक व ठोस मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.
