पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण व विविध विषयांच्या सभांचे कामकाज अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी त्या सभांचे व्हिडिओ शूटिंग करून थेट प्रक्षेपण सुरू करावे, अशी

महत्त्वपूर्ण मागणी नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या सभांबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. शहराच्या विकासासंदर्भात कोणते निर्णय घेतले जात आहेत, कोणत्या विषयांवर चर्चा होत आहे, याची माहिती नागरिकांना थेट मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व सभांचे व्हिडिओ शूटिंग करून त्याचा डेटा जतन करण्यात यावा.
तसेच पालिकेच्या इमारतीबाहेर मोठा स्क्रीन लावून कर्मचारी व नागरिकांना सभेचे थेट प्रक्षेपण पाहता येईल, अशी व्यवस्था करावी. यासोबतच केबल टीव्हीच्या माध्यमातून शहरभर सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना पालिकेचे कामकाज दृश्य स्वरूपात समजू शकेल.
शहरात पत्रकारांची संख्या मोठी असल्याने सर्वांना सभागृहात प्रवेश देणे शक्य नसल्याचे नगरसेवकांनी मान्य केले आहे. मात्र प्रत्येक पत्रकार संघटनेच्या किमान दोन प्रतिनिधींना सभागृहात बातमी संकलनासाठी सन्मानपूर्वक प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण सहा ते आठ पत्रकारांना सभागृहात स्थान देणे शक्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवकांनी २४ फेब्रुवारी २०२६ पासून या उपक्रमाची सुरुवात करण्याची विनंती केली असून टप्प्याटप्प्याने सर्व मागण्या अमलात आणाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवेदनावर सौ. जयश्रीताई अनिल पाटील, डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, भरतकुमार सुरेश ललवाणी, सचिन विभाकर कासार, देवेंद्र भानुदास कांबळे, प्रवीण गंगाराम पाटील, सौ. नंदा नरेंद्र संदानशिव, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील, सौ. जुबेदाबी नसिरोद्दीन, सौ. कविता विजय राजपूत, सौ. अफसाना मुक्तार खाटीक, सौ. योगिता सयाजीराव कापडणेकर आणि सौ. शोभाबाई भिवसन गढरे यांच्या स्वाक्षऱ्या आहे
