अमळनेर कोर्टाचा मोठा निर्णय : शरद शिंदे यांच्या घराच्या ताब्याला धक्का लावण्यास मनाई▪️ बेकायदेशीरपणे घर पाडणाऱ्यांना न्यायालयाचा दणका…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर — अमळनेर येथील दिवाणी न्यायालयाने ‘न्यू प्लॉट’ परिसरातील जागेप्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश देत वादी शरद शिंदे यांच्या घराच्या ताब्याला धक्का लावण्यास प्रतिवाद्यांना तात्पुरती मनाई केली आहे. या निर्णयामुळे बेकायदेशीरपणे घर पाडण्याचा आणि जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
प्रकरणात वादी शरद शिंदे यांनी न्यायालयात धाव घेत सांगितले होते की, ते संबंधित मालमत्तेचे भाडेकरू असून तेथे वास्तव्यास आहेत. मात्र प्रतिवादी महेश व इतरांनी कायदेशीर प्रक्रिया न पाळता जबरदस्तीने घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासोबतच बिल्डर सरजू गोकलानी आणि त्यांच्या माणसांनी जेसीबीच्या साहाय्याने घर पाडल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंब उघड्यावर आले होते.
या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला असून, वादींकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची — जसे की कर पावत्या व वीज बिल — न्यायालयाने दखल घेतली. या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी शिंदे यांचा संबंधित जागेवर ताबा असल्याचे स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, तातडीने मनाई हुकूम न दिल्यास वादींच्या हक्कांचे अपरिमित नुकसान झाले असते.
न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
▪️ तात्पुरता मनाई हुकूम
पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवाद्यांनी वादींच्या ताब्यातील मालमत्तेत कोणताही अडथळा निर्माण करू नये, असा एकतर्फी तात्पुरता मनाई आदेश देण्यात आला आहे.
▪️ कारणे दाखवा नोटीस
हा मनाई आदेश पुढे का कायम ठेवू नये, याबाबत प्रतिवाद्यांना आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अमळनेर येथील सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एन. आर. यलमाने यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी हा आदेश पारित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
शिंदे यांच्या वतीने ॲड. वाय. पी. पाटील व ॲड. चेतना पाटील यांनी काम पाहिले.
या निर्णयामुळे बेकायदेशीर कारवायांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, कायद्याच्या चौकटीतच कारवाई व्हावी, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.
