अमळनेर येथे ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी; नरडाणा येथे बायपास लाईनचा प्रस्ताव..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर रेल्वे यात्री मंचाच्या वतीने खासदार स्मिता ताई वाघ यांना निवेदन देत अमळनेर रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

धार्मिक तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून अमळनेर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा येथे होत असल्याने पुढील एक्सप्रेस गाड्यांना अमळनेर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे:
प्रेरणा एक्सप्रेस (22137/22138)
पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस (12843/12844) (वाया ब्रह्मपुर)
चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी एक्सप्रेस (20625/20626)
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांचा थांबा अत्यावश्यक असल्याचे मंचाने निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, खानदेश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या मनमाड – इंदूर रेल्वे लाईनच्या कामाच्या पार्श्वभूमीवर नरडाणा येथे अमळनेरकडे बायपास लाईन मंजूर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ही बायपास लाईन मंजूर झाल्यास अमळनेर, धरणगाव आणि जळगाव येथील प्रवाशांना धुळे व मनमाडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन वेळेची मोठी बचत होईल.
या वेळी अमळनेर रेल्वे यात्री मंचाचे अध्यक्ष डॉ. इम्रान अली शाह यांच्यासह झाकीर मेवाती, रतीलाल चौहान आणि अशफाक शेख उपस्थित होते.
