अमळनेरात कायद्याला खुलेआम आव्हान ! घर जमीनदोस्त प्रकरणातील आरोपी मोकाट — CID चौकशीची मागणी तीव्र..

0
New-Doc-02-15-2026-07.20.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथील न्यू प्लॉट परिसरातील देशमुख चाळीत 10 फेब्रुवारी 2026 रोजी जेसीबीच्या सहाय्याने शरद शिंदे यांचे राहते घर जमीनदोस्त करणाऱ्या सरजू गोकलानी, महेश देशमुख व कथित गावगुंडांना तात्काळ अटक करावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केली आहे.


यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, संबंधित आरोपी अजूनही मोकाट फिरत असून अमळनेर पोलीस स्टेशनने तब्बल 24 तास उशिरा गुन्हा दाखल केला. याशिवाय फिर्यादीवर समझोत्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षपाती व बिल्डरधार्जिण्या अधिकाऱ्यांकडून तपास काढून घेऊन सीआयडीकडे सोपवावा, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
देशमुख चाळीत सुमारे 20 भाडेकरू राहत असून नयन शरद शिंदे व योगेश रमेश पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांच्या कुटुंबांनाच अमळनेरमध्ये सुरक्षितता नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. साने गुरुजींच्या कर्मभूमीत घडलेली ही घटना लाजिरवाणी असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
धनदांडग्यांकडून पोलिसांच्या कथित सहकार्याने गरीबांना उध्वस्त करण्याचा प्रकार सुरू असून महिला व सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक कुटुंबे घरे सोडून स्थलांतरित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांना करण्यात आले आहे. अमळनेरच्या इतिहासातील ही अभूतपूर्व घटना असून नागरिकांनी याविरोधात उभे राहण्याची वेळ आली असल्याचे प्रा. पवार यांनी म्हटले आहे.
तसेच, बिल्डरांच्या दबावाला बळी पडलेल्या नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी भाडेकरू व सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, डीआयजी नाशिक, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव व डीवायएसपी अमळनेर यांची भेट घेऊन न्याय मिळवण्यासाठी लढा उभारणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed