जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू.                         संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड..

0
New-Doc-02-14-2026-07.16.jpg

जळगाव /प्रतिनिधी

जळगाव शहरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज जळगावमधील कालिंका माता चौकात एका भरधाव डंपरने ५७ वर्षीय

वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जमावाने डंपरची दगडफेक करून तोडफोड केली आहे.

प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात मग्न होता. चालकाचे लक्ष नसल्याने डंपरचे चाक थेट पाटील यांच्या चेहऱ्यावरून गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतापलेल्या जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक करत त्याची तोडफोड केली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याच कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी एका बालकाचाही डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.

घटनास्थळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, स्थानिक नगरसेवक सुनील वामनराव खडके, डॉ. विश्वनाथ खडके यांनी उपस्थिती देऊन माहिती जाणून घेतली. मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. मयत प्रभाकर पाटील हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed