सरकारी दवाखान्या जवळ गटारी तुंबल्या; अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न..
अमळनेर /आबिद शेख
शहरातील वॉर्ड क्रमांक ५ मधील सरकारी दवाखान्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून गटारी तुंबून भरून पडल्या आहेत. दवाखान्याच्या आजूबाजूला घाण साचलेली असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागत आहे.

रुग्णालय परिसर हा स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी ओळखला जावा अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात येथे दुर्गंधी, साचलेले पाणी व कचरा यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गटारी वेळेवर साफ न केल्याने डास व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छतेऐवजी घाणीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः आजारी व्यक्तींना अशा अस्वच्छ वातावरणात येणे आरोग्यास अधिक घातक ठरू शकते, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन गटारींची साफसफाई करावी व दवाखाना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
