अमळनेरात डंपरखाली तरुण चिरडला; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको… परिसरात अतिक्रमण वाढले…
अमळनेर आबिद शेख
अमळनेर शहरात डंपरखाली तरुण चिरडल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पैलाड भागातील शनीपेठ येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.

दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पैलाड भागातील शनीपेठ येथे धुळे-चोपडा मार्गावर मातीने भरलेल्या डंपर (क्र. एमएच 48 एजी 8307) खाली ताडेपुरा येथील जितेंद्र अरुण चव्हाण (वय 30) हा तरुण चिरडला गेला. या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, धुळे-चोपडा मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांनी संबंधित रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ हटवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
