अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार. – अनिल भाईदास पाटील. 19 कोटी 80 लाख. नुकसानभरपाईसह रब्बीसाठी हेक्टरी 10 हजार; 39 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा..
अमळनेर /आबिद शेख
ऑक्टोबर 2025 मध्ये अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुहेरी

मदतीचा हात दिला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
या मदतीअंतर्गत तालुक्यातील सुमारे 39 हजार 541 शेतकऱ्यांना एकूण 19 कोटी 80 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. यासोबतच खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार रुपयांची अतिरिक्त मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.
पंचनाम्यांमुळे मदत मिळण्यास गती
30 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आमदार पाटील यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.
खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दुहेरी मदतीमुळे तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲग्रीस्टॅक क्रमांकाद्वारे थेट खात्यात रक्कम
19 कोटी 80 लाख रुपयांची मदत ई-केवायसीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून ती ॲग्रीस्टॅक क्रमांकाच्या आधारे वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ॲग्रीस्टॅक क्रमांक नोंदणी करून तलाठी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर तहसीलदारांनी ॲग्रीस्टॅक संदर्भात केलेल्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना सुविधा केंद्रांवर वारंवार जाण्याची गरज भासणार नसून मदत थेट खात्यात जमा होत आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुहेरी मदत दिल्याबद्दल आमदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत.
