पहाटे ४ वाजताच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची कसाली मोहल्ला रहिवाशांची मागणी..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला परिसरात पहाटे ४ वाजता होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गैरसोयीबाबत युवा नेते नईम पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील

नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देत पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी केली आहे.
सध्या कसाली मोहल्ला भागात पहाटे ४ वाजता पाणीपुरवठा केला जात असून ही वेळ विशेषतः महिला व लहान मुलांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत आहे. पहाटेच्या वेळी झोपेचा खोळंबा होत असून महिलांना लहान मुलांना घेऊन पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे शारीरिक कष्टासोबतच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.

इलेक्ट्रिक्क दु-हीलर विक्री व सर्विस
नए शोरुम का भव्य उद्घाटन आज
नागरिकांच्या दैनंदिन दिनचर्येवर या वेळेमुळे परिणाम होत असून कामावर जाणाऱ्या व्यक्तींनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची वेळ बदलून सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युवा नेते नईम पठाण यांच्यासह अफरोज मिस्त्री, इस्त्याक मौलाना, जुनेद शेख, राजा पठाण, रिजवान मन्यार आदी नागरिक उपस्थित होते. नगर परिषद प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
