प्रामाणिकतेचे उदाहरण : शहा आलम नगरमध्ये सापडलेले २५ हजार रुपये मालकाला परत.
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : शहरातील शहा आलम नगर परिसरात सापडलेली २५ हजार रुपयांची रोकड प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन नागरिकत्वाचे उत्तम उदाहरण अब्दुल हनीफ शेख नथु (रा. शहा आलमनगर, नगर) यांनी घालून दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहा आलम नगर येथे २५ हजार रुपये पडलेले अब्दुल हनीफ शेख यांना आढळून आले. कोणाचातरी महत्त्वाचा पैसा हरवला असावा, या भावनेतून त्यांनी कोणताही मोह न बाळगता सदर रक्कम तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या ताब्यात जमा केली.
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून सदर रक्कम इसामोद्दीन शेख यांची असल्याची खात्री केली. आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आज ती रक्कम इसामोद्दीन शेख यांना परत देण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक नवीद शेख, गुलाम नबी आदी उपस्थित होते. अब्दुल हनीफ शेख यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

