उस्मानिया पार्क परिसरात गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत; ३ जिवंत काडतुसे जप्त..

0
New-Doc-02-12-2026-09.37.jpg


जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरातून एका तरुणास गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहुनगर, जळगाव) हा उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरात मोटरसायकलवर गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचून उस्मानिया पार्क परिसरातून रात्री आरोपीस ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ०१ गावठी कट्टा व ०३ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच त्याची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३७/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र कायदा १९५९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच फौजदार अतुल वंजारी, पोहेकों विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा/सुनील पाटील, जळगाव शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed