गांधली ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; सरपंच नरेंद्र पाटील यांचा गावकऱ्यांप्रती कृतज्ञताभाव..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील गांधली ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या निमित्ताने सरपंच नरेंद्र पाटील यांनी गावकऱ्यांचे आभार मानत गेल्या पाच वर्षांच्या विकासकामांचा आढावा घेत कृतज्ञता व्यक्त केली.

सरपंच नरेंद्र पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “गेल्या पाच वर्षांचा कालावधी कसा निघून गेला हे कळलेच नाही. या काळात गांधली गावासाठी जे काही विकासकाम करता आले, त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे व ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे.”
या कार्यकाळात उपसरपंच शिवदास पारधी, माजी उपसरपंच राजश्री किरण महाजन, माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. कविता सुनील पाटील, सौ. विद्या नरहरी पाटील, सौ. वैशाली योगेश चव्हाण, श्रीमती बेबाबाई दिलीप भील, श्री अशोक दादा पाटील, राहुल बाविस्कर आदी सदस्यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्य व एकमुखी पाठिंबा यामुळे विविध विकासकामे पूर्ण करता आली, असे त्यांनी नमूद केले.
तसेच ग्रामसेवक श्री. नितीन साळुंखे, सध्याचे ग्रामविकास अधिकारी श्री. प्रमोद पाटील, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक, मातृ-पितृतुल्य व्यक्ती, समवयस्क बांधव-भगिनी तसेच क्रियाशील युवक-युवती यांच्या मौलिक सहकार्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
गावातील विकासकामे राबविताना ग्रामस्थांनी सुचवलेले बदल स्वीकारण्यात आले व त्यांच्या सूचनांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. काही कामे निधीअभावी किंवा प्रशासकीय मंजुरीअभावी प्रलंबित राहिली असली, तरी ती भविष्यात पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विकासकामांदरम्यान अनवधानाने कुणाला त्रास किंवा गैरसोय झाली असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सरपंचांनी गावकऱ्यांची माफी मागितली. “वैयक्तिक त्रास देण्याचा कोणाचाही हेतू नव्हता. आपण मोठ्या मनाने आमच्या चुकांकडे दुर्लक्ष कराल, ही अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी, “गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व प्रेमाबद्दल मी सदैव ऋणी राहीन,” असे म्हणत सरपंच नरेंद्र पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गांधलीकरांचे मनःपूर्वक आभार मानले.
