देवगाव खूनप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा..
आबिद शेख/अमळनेर
चोपडा तालुक्यातील देवगाव येथील खूनप्रकरणी आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33, रा. पुनगाव ता. चोपडा, हल्ली मु. देवगाव ता. चोपडा) यास मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा

सुनावली आहे. दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.
याबाबत अडावद पोलीस ठाणे गु.र.नं. 149/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेशन केस क्र. 13/2022 मध्ये भा.दं.वि. कलम 302 व 504 अन्वये दोषारोप ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीस भा.दं.वि. कलम 304 (2) अन्वये दोषी ठरविले.
घटनेचा तपशील
दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास देवगाव येथील प्लॉट भागात फिर्यादी भावना रविंद्र पाटील यांच्या घरासमोर ही घटना घडली. फिर्यादीचे पती रविंद्र विश्राम पाटील हे दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करीत होते. त्यावेळी आरोपी चंद्रशेखर सपकाळे याने “मला का शिवीगाळ करतो?” असे म्हणत वाद घातला.
रविंद्र पाटील यांनी “मी तुला शिवीगाळ करत नाही,” असे सांगितल्याने आरोपी संतापला. त्याने रविंद्र पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. तसेच जवळच असलेल्या बैलगाडीच्या लाकडी शिंगाड्याने त्यांच्या पोटावर व पाठीवर जीवघेणी मारहाण केली.
जखमी अवस्थेत रविंद्र पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
न्यायालयीन कार्यवाही
सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण 9 साक्षीदार तपासले.
यामध्ये फिर्यादी (मयताची पत्नी), मयताचे वडील व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. तसेच डॉ. निलेश देवराज यांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमांमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम 304 (2) अन्वये दोषी धरून 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तपासात सहकार्य
या प्रकरणाच्या कामकाजात पो.कॉ. सतीष भोई (अडावद पो.स्टे.), पीएसआय उदयसिंग सांळुके (पारोळा पो.स्टे.), पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर) तसेच पो.कॉ. भरत इशी (मारवड पो.स्टे.) यांनी सहकार्य केले.
