कळमसरे येथे विना परवानगी ३ निंबांची झाडे तोडली; ठेकेदारावर कारवाईची मागणी. सरपंच-उपसरपंचांनी वनविभागाकडे दिले निवेदन.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील मौजे कळमसरे येथे मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने कोणतीही

अधिकृत परवानगी न घेता जागेवरील तीन निंबाची झाडे बेकायदेशीररित्या तोडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत कळमसरेचे सरपंच व उपसरपंच यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग पारोळा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, कळमसरे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम मंजूर झाले असून कामास सुरुवात करण्यापूर्वी ठेकेदाराने लाईनआउट देताना जागेवरील सुमारे १० ते १२ वर्षे वयाची तीन निंबाची झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडून टाकली. ही झाडे निरोगी अवस्थेत असून पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती, असे नमूद करण्यात आले आहे.
दरवर्षी शासनाकडून वृक्षलागवडीसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो तसेच वृक्षसंवर्धनासाठी विविध मोहिमा राबविल्या जातात. अशा परिस्थितीत विना परवानगी वृक्षतोड करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित ठेकेदारावर वनकायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणी वनविभागाने तातडीने पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित बांधकामस्थळी योग्य सूचना व नियमांची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनासोबत झाडतोडीचे फोटो व जागेचा उतारा जोडण्यात आले असून वनविभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे
