कॉपीमुक्त परीक्षा नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय; अमळनेर PTAचा प्रशासनाला इशारा..

0
New-Doc-02-10-2026-07.18.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर येथील खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) यांच्या वतीने सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण

विभागाला निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना देण्यात आले. यावेळी PTA संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात मागील काही परीक्षांदरम्यान मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे गंभीर वास्तव नमूद करण्यात आले आहे. कॉपीमुळे गुणफुगवटा होत असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. परीक्षा केंद्रांवर जर कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर मेहनती विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
PTA संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात असून, या पार्श्वभूमीवर परीक्षाकाळात कठोर दक्षता, भरारी पथकांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच मुक्त कॉपीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा क्लासेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed