मागासवर्गीय महिलेवर अत्याचाराचा आरोप; अमळनेरच्या कसाली मोहल्ल्यातील तरुणावर मारवड पोलिसांत गुन्हा..
आबिद शेख /अमळनेर रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय २४ वर्षीय परित्यक्ता महिलेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना दिनांक ६ रोजी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील पिर बाबांच्या

दर्ग्याजवळ घडली. या प्रकरणी अमळनेर येथील तरुणावर अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकिबखान गफ्फारखान (रा. कसाली मोहल्ला, मशीदजवळ, अमळनेर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मूळची मध्यप्रदेशातील असून रेल्वेत भीक मागण्याचे काम करते. तिची आरोपी आकिबखान याच्याशी काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला व ते अधूनमधून भेटत होते. प्रत्येक भेटीत आरोपी महिलेला जेवण व पैसे देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
दिनांक ६ रोजी ही महिला बऱ्हाणपूर येथून रेल्वेने आली असता आरोपी आकिबखानने तिला अमळनेर येथे उतरवून घेतले. त्यानंतर गप्पा झाल्यानंतर आरोपीने मोटारसायकल (क्र. MH-19 DJ-2955) वर आपल्या समीर नावाच्या मित्रासह तिला धार येथील पिर बाबांच्या दर्ग्याच्या परिसरात नेले. दर्ग्याजवळील खालील बाजूस असलेल्या कच्च्या रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये आरोपीने महिलेबरोबर शरीरसुखाची मागणी केली.
महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर “आता मी कुठे जाऊ?” असे सांगितल्यावर आरोपीने तिला परत रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.
यानंतर पीडित महिलेने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तिला घटनास्थळी नेले असता हा परिसर मारवड पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पीडितेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा तसेच अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मारवड पोलीस करीत आहेत.
