गांधली येथे Whirlpool इंडिया कंपनीचा भव्य कामगार मेळावा; युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी..
आबिद शेख/अमळनेर
गांधली व परिसरातील कुशल तसेच अकुशल युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून, Whirlpool इंडिया कंपनीच्या वतीने

गांधली येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कामगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना थेट नोकरीची संधी मिळणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटीआय (ITI), डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कामाच्या स्वरूपानुसार महिन्याला 16,000 रुपये ते 30,000 रुपये इतका आकर्षक पगार देण्यात येणार आहे.
याशिवाय निवड झालेल्या कामगारांना कॅन्टीन सुविधा, महिलांसाठी बस सुविधा, पीएफ (PF) व ईएसआयसी (ESIC) यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे युवकांना सुरक्षित आणि स्थिर रोजगाराची संधी मिळणार आहे.
या भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत गांधली यांच्या वतीने करण्यात आले असून, ग्रामविकास विचार मंच, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त आवाहनावरून जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गांधली व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी हा कामगार मेळावा रोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, युवकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
