कळमसरे–शहापूर रस्त्यावर अपघाताला आमंत्रण!रस्त्याचे काम सुरू; मात्र सूचना फलकांचा अभाव, वाहनचालकांच्या जीवाशी खेळ.
24 प्राईम न्यूज 9 Feb 2026
कळमसरे–शहापूर रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामाला सुरुवात झाली असून या मार्गावर सध्या फरशी पुलांचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक,

धोक्याचे चिन्ह अथवा दिशादर्शक नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सध्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. कामात माती मिश्रित बारीक खडी टाकून ती दाबली जात आहे. शहापूर–कळमसरे या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर तब्बल दहा ठिकाणी लहान फरशी पुलांचे काम प्रस्तावित असून त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले आहे.
फरशी पुलाच्या कामामुळे मूळ रस्ता कोरला गेल्याने बाजूला तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र अंधारात वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने वाहन थेट खोदलेल्या भागात जाण्याचा धोका कायम आहे. रस्त्यावर कोणतेही सूचना फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स किंवा धोक्याच्या सूचना नसल्याने संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.
रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामाच्या ठिकाणी सूचना फलक लावणे, रात्रीच्या वेळी दिवे किंवा रिफ्लेक्टर बसवणे हे बंधनकारक असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
कामाच्या गुणवत्तेकडेही दुर्लक्ष?
हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. माजी मंत्री अनिल पाटील यांनी मागील पंचवार्षिक कालावधीत या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, दीर्घकाळ टिकणारे असावे, अशी अपेक्षा कळमसरे व शहापूर येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
कामात गुणवत्ता आढळून न आल्यास ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम थांबविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
