लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी खरेदी कर रद्द करण्याची मागणीअखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे नगरपरिषदेला निवेदन..
अमळनेर /आबिद शेख
दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमळनेर नगरपरिषदेचे नूतन अध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यानंतर ग्राहक पंचायततर्फे लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज तसेच प्रॉपर्टी खरेदीदारांवर लावण्यात येणारा दोन टक्के कर रद्द करण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षांपासून “लोकवर्गणी” या नावाखाली मोठ्या प्रमाणात कर वसुली करीत आहे. ही कर आकारणी अन्यायकारक व बळजबरीची असून ती आकारण्यामागे कोणतेही ठोस कारण नगरपरिषदेने स्पष्ट केलेले नाही. तसेच सन २०२४–२०२५ पासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर आर्थिक वर्ष ३१ मार्चपर्यंत मुदत असतानाही ३१ डिसेंबरपासूनच दोन टक्के दराने व्याज आकारून नागरिकांकडून वसुली केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून पाणीपट्टीवरील व्याज (वॉटर सेस) तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच प्रॉपर्टी खरेदीच्या रकमेवर खरेदीदारांकडून आकारण्यात येणारा दोन टक्के करही विनाकारण व अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद आहे. आधीच खरेदीच्या वेळी स्टॅम्प ड्युटी व इतर शासकीय कर नागरिकांकडून घेतले जात असताना, नगरपालिकेने केवळ नाव बदलाची प्रक्रिया करायची असते, त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. तरीही हा कर का आकारला जात आहे याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हा कर त्वरित रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी याच विषयावर निवेदन दिले असता “पुढील काळात लोकवर्गणी व त्यावरील दोन टक्के व्याज आकारणी केली जाणार नाही,” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजतागायत लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील दोन टक्के व्याज रद्द करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने हे पुन्हा निवेदन देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर आपल्या स्तरावर योग्य ते आदेश व्हावेत, अशी विनंती करण्यात आली.
याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक प्रताप अण्णा साळी व नगरसेवक प्रा. रामकृष्ण पाटील यांचेही ग्राहक पंचायततर्फे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे अध्यक्ष ॲड. सौ. स्मिता चंदात्रे, ॲड. सौ. भारती अग्रवाल, सौ. कपिला मुठे, सौ. वनश्री अमृतकर, सौ. ज्योती भावसार, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख, जयंतीलाल वानखेडे, श्री व सौ. रजनी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही माहिती सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 159700
22 Ct सोने 91.60% : ₹. 147000
18 Ct सोने 75.00% : ₹. 121400
शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
