अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त २४ वाहनांचा १८ फेब्रुवारीला लिलाव..

0
New-Doc-02-06-2026-08.11.jpg


अमळनेर /आबिद शेख. अमळनेर तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या एकूण २४ वाहनांचा लिलाव मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचे आदेश तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिले आहेत.
अमळनेर तालुक्यातून वाहणाऱ्या तापी, पांझरा व बोरी नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून, त्यास आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमांदरम्यान मागील काही वर्षांत महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून ११ अॅपेरिक्षा व १३ ट्रॅक्टर अशी एकूण २४ वाहने जप्त केली आहेत.
ही सर्व जप्त वाहने सध्या तहसील कार्यालय, शासकीय धान्य गोदाम तसेच विविध पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आलेली आहेत. संबंधित वाहनमालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही वाहनमालकांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे महसूल अधिनियमानुसार या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर लिलाव तहसील कार्यालय, अमळनेर येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार असून, लिलावातून मिळणारी रक्कम शासनाच्या महसुलात जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed