अजितदादांच्या निधनाने माझा आनंद हरपला; आयुष्याला नवी दिशा देणारे नेतृत्व कायमचे हरपले – आ. अनिल पाटील
अमळनेर | आबिद शेख
“राजकीय जीवनातील अत्यंत कठीण काळात ज्यांनी मला नवी वाट, नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नवे राजकीय वैभव दिले, तेच आदरणीय अजितदादा पवार आज कायमचे आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाने माझा आनंदच हरपला असून मी खऱ्या अर्थाने सर्वस्व गमावून बसलो आहे,” अशी हृदयद्रावक भावना अमळनेरचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपाच्या माध्यमातून सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपले राजकीय भवितव्य अंधारात गेले होते. आर्थिक अडचणी, व्यवसायातील संकटे आणि मानसिक खचलेपणाच्या अवस्थेत असताना आदरणीय अजितदादांची भेट जीवनाला कलाटणी देणारी ठरली, असे सांगताना आ. पाटील भावूक झाले. “पहिल्याच भेटीत दादांनी माझ्या अंतर्मनातील वेदना ओळखल्या. पाठीवर हात ठेवून ‘लढ’ असे सांगताना त्यांनी दिलेले बळ हे माझ्यासाठी देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हते,” असे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या मार्गदर्शनामुळेच व्यवसायिक अडचणी दूर झाल्या आणि राजकीय लढ्यासाठी नवे बळ मिळाले. भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असतानाही अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून, असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जनतेच्या आशीर्वादाने अमळनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळाली. त्यानंतर पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून मोठी जबाबदारी, पुढे कॅबिनेट मंत्रिपद देऊन एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचे काम अजितदादांनी केले, असे आ. पाटील म्हणाले.
त्यांच्या पाठबळामुळे अमळनेर तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी पाडलसरे धरणास गती मिळाली तसेच कोट्यवधी रुपयांची ऐतिहासिक विकासकामे मतदारसंघात पूर्ण करता आली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही अजितदादांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदारकीचा बहुमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी मुंबईत अजितदादांची भेट होऊन सकारात्मक चर्चा झाल्या होत्या; मात्र नियतीने घातलेला घाव अतिशय वेदनादायी ठरला. “२८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आमचे नेते, मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. हा धक्का पचवणे अशक्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादा केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर अहोरात्र काम करणारे विकासाचे ‘यंत्र’ होते. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरील वचक आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. “अनिल, तू काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे,” हा त्यांचा खंबीर आवाज आज कायमचा शांत झाला असून महाराष्ट्राने विकासाचा महामेरू गमावला आहे, असे आ. पाटील म्हणाले.
या कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत, सुनेत्रा वहिनी, पार्थ व जय यांना ईश्वर दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
“दादा, तुम्ही आमच्यात नसाल तरी तुमचे विचार आणि तुम्ही दाखवलेला विकासाचा मार्ग आम्ही कधीही सोडणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
