अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते डॉ. दिपाली साळुंखे यांना ‘महाराष्ट्र बिझनेस स्टाईल आयकॉन अवॉर्ड 2025’ प्रदान..

अमळनेर | आबिद शेख
तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक, अमळनेर येथील संचालिका तथा प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिपाली साळुंखे यांना सन 2025 करिता ‘महाराष्ट्र बिझनेस स्टाईल आयकॉन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सोमा वाईन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आरोग्य व सौंदर्य क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण उपचारपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच रुग्णकेंद्रित सेवेमुळे डॉ. दिपाली साळुंखे यांनी अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक मार्फत त्वचा व केसांशी संबंधित विविध आजारांवर प्रभावी व विश्वासार्ह उपचार देत त्या अमळनेरसह परिसरातील रुग्णांचा विश्वास संपादन करत आहेत.
या पुरस्काराने डॉ. दिपाली साळुंखे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासह उद्योजकतेतील यशस्वी वाटचालीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कार्यक्रमास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, डॉक्टर व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. दिपाली साळुंखे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, रुग्णवर्ग व सहकाऱ्यांना दिले. “अमळनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दर्जेदार आणि आधुनिक त्वचारोग उपचार उपलब्ध करून देणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
या सन्मानाबद्दल अमळनेर शहरातून तसेच वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा पुरस्कार शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.
