पळसदळे ग्रामपंचायतीच्या वार्षिक सभेत गोंधळ; प्रश्नांना उत्तरे न देता ग्रामसेवक दप्तर उघड्यावर सोडूनआम सभेतून बाहेर,

0
New-Doc-01-26-2026-22.16.jpg


अमळनेर /आबिद शेख
गणतंत्र दिनानिमित्त पळसदळे ग्रामपंचायतीची वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेस ग्रामसेवक, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेदरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वार्षिक लेखाजोखा तसेच विविध विकासकामांबाबत ग्रामसेवक पाटील मॅडम यांना प्रश्न विचारले. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. प्रश्नांची उत्तरे न देता ग्रामसेवक मॅडम यांनी अचानक भर सभेतून बाहेर पडल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांनी त्यांच्या मागे जाऊन “प्रश्नांची उत्तरे द्या, दप्तर कार्यालयात ठेवा” अशी विनंती केली असता, ग्रामसेवक मॅडम यांनी सर्व दप्तर आत न ठेवता सभेतून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या मते, जर प्रश्नांची उत्तरे दिली असती तर कथित अनियमितता उघडकीस आली असती, त्यामुळेच ग्रामसेवकांनी सभा अर्धवट सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गणतंत्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये सर्व अधिकारी व्यस्त असल्याने त्वरित संपर्क होऊ शकला नाही. यानंतर ग्रामस्थांनी खासदार स्मिता ताई यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. खासदार स्मिता ताई यांनी बीडीओ साहेबांशी चर्चा करून ग्रामसेवक मॅडम यांना जाब विचारला, मात्र तरीही ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शेवटी गावचे पोलीस पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. काही वेळानंतर बीडीओ साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यांना संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. बीडीओ साहेबांच्या सूचनेनुसार सरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील व उपस्थित नागरिकांच्या साक्षीने सर्व शासकीय दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आले. तसेच पुढील चौकशीपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय सील करण्यात आले असून, ग्रामपंचायतीची चावी सरपंच व शिपाई यांच्याकडे देण्यात आली आहे.
या प्रकरणी ग्रामस्थ उमेश पाटील, भिकन बोरसे, हर्षल पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, नाना अभिमान पाटील, मनोज पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed