प्राणांची बाजी लावून वाचवला जीव! हर्षल पाटील व प्रशांत पाटील यांच्या साहसाला सलाम.

0

अमळनेर/आबिद शेख.       

                               अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत एक थरारक घटना घडली. पावसाच्या प्रचंड प्रवाहात सुमारे १५ ते २० फूट खोल नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचे प्राण दोन धाडसी तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवले. या साहसी बचावामुळे परिसरात दोन्ही युवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण रामलाल जैन यांचे पुत्र महावीर जैन हे पिंपळे रोड परिसरातील नाल्याजवळ असताना पावसाच्या वेगवान प्रवाहात तोल जाऊन नाल्यात पडले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ते काही क्षणांतच वाहून जाऊ लागले. ही बाब लक्षात येताच मारवड येथील हर्षल पाटील आणि धुपी येथील प्रशांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसी निर्णय घेत थेट वाहत्या पाण्यात उडी मारली.
पूराच्या वेगवान प्रवाहाशी झुंज देत दोघांनी अथक प्रयत्न करून महावीर जैन यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना सुरक्षितपणे नाल्याबाहेर काढले. या संपूर्ण बचावकार्यात दोन्ही युवकांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधानामुळे एक अनर्थ टळला.
बचावानंतर महावीर जैन यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. काही काळ त्यांची श्वसनक्रिया बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपस्थित नागरिकांनी आणि मदतकर्त्यांनी तातडीने प्राथमिक मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या प्राणांची रक्षा करण्यात यश आले.
या धाडसी बचावामुळे हर्षल पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एका युवकाला नवजीवन देणाऱ्या या दोन्ही तरुणांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. त्यांच्या धैर्य, माणुसकी आणि प्रसंगावधानामुळे संकटाच्या क्षणीही मानवतेचा जिवंत आदर्श पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed