एम.आय.एम. नगरसेवक सैय्यद रफअत हुसैन यांची जिल्हा रुग्णालयास भेट; रोटरी क्लबच्या शस्त्रक्रिया शिबिराचे कौतुक.

0
New-Doc-01-25-2026-23.01.jpg


नंदुरबार | प्रतिनिधी
रोटरी क्लबतर्फे जिल्हा नागरी रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जन्मजात अस्थिव्यंगत्व असलेल्या मुलांसाठी आयोजित विशेष शस्त्रक्रिया शिबिरात एकूण २३ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, या माध्यमातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
या स्तुत्य उपक्रमात मुंबईसह देशातील विविध मोठ्या शहरांतील नामवंत व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सहभाग नोंदवून आपली वैद्यकीय सेवा दिली. या शिबिराचे महत्त्व लक्षात घेऊन नंदुरबार नगरपालिकेतील AIMIM चे नवनिर्वाचित नगरसेवक व गटनेते सैय्यद रफअत हुसैन यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी सैय्यद रफअत हुसैन यांनी रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच बाहेरून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले,
“अशी सेवाभावी शिबिरे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदान ठरतात. मोठ्या शहरांतील महागड्या उपचारांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या कुटुंबांसाठी हे शिबिर आशेचा किरण आहे.”
या प्रसंगी निहाल अहमद, रोटरी क्लबचे इसरार सर तसेच रोटरी क्लबचे इतर वरिष्ठ सदस्य व मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील नागरिकांनी रोटरी क्लब व डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले असून, भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed