अमळनेर येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मशताब्दी जयंती उत्साहात साजरी…
अमळनेर | आबिद शेख
हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच स्वातंत्र्यसेनानी, प्रखर राष्ट्रभक्त क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर येथे प्रथमच भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या जन्मशताब्दी जयंतीचे औचित्य साधून शिवसेना अमळनेरच्या वतीने सकाळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी न्यू प्लॉट येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
संध्याकाळी महाराणा प्रताप चौक येथे संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्व महापुरुषांना उपस्थितांनी अभिवादन केले. शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसरात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, शिवसेना गटनेते पंकज चौधरी, बांधकाम सभापती साहेबराव पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक श्रीराम चौधरी, गुलाब पाटील, नाविद शेख, सुयोग धनगर, दीपक चौगुले, बाळासाहेब संदानशिव, तुळशीराम हटकर, सुरज परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील, नगरसेविका अपूर्वा चौधरी, जालू चौधरी यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जन्मशताब्दी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक व राष्ट्रप्रेरणादायी उपक्रमांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
