यूट्युबवर प्रशिक्षण घेऊन एटीएम चोरीचा प्रयत्न अमळनेर–शिरपूर–धुळे येथे धुमाकूळ; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश पिकअप वाहनासह दोन आरोपी शिरपूर पोलिसांच्या ताब्यात…
अमळनेर | आबिद शेख
शहरातील मुख्य रस्त्यावरील मंगलमूर्ती चौकातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम मशीनला साखळीच्या सहाय्याने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. १६ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेच्या तपासातून संपूर्ण महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून शिरपूर पोलिसांनी पिकअप वाहनासह दोन आरोपींना अटक केली आहे.

अमळनेर येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक चोरटा पिकअप व्हॅन घेऊन एटीएमजवळ आला. त्याने प्रथम एटीएमचा अलार्म बंद करून सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले. त्यानंतर लोखंडी साखळीच्या सहाय्याने एटीएम मशीन ओढून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठा आवाज झाल्याने वरच्या मजल्यावर राहणारे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते.
शिरपूर येथे रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न
दि. १७ जानेवारी रोजी रात्री २.१५ वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील कॉटेज हॉस्पिटलसमोरील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रात्रगस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता चोरटे पसार झाले होते.
पोलिसांनी परिसरात शोध घेत असताना पित्रेश्वर स्टॉपजवळ संशयास्पद पिकअप वाहन आडोशाला उभे असल्याचे आढळून आले. पोलिस वाहन पाहताच आरोपींनी शहादा फाट्याकडे पळ काढला. सिनेस्टाईल पाठलागानंतर आरोपी वाहन सोडून पसार झाले. तपासात सदर पिकअप वाहन मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींची ओळख उघड
पोलिसांनी तपासचक्र फिरवून मुख्य आरोपींपर्यंत पोहोचत
हेमंत सुकलाल माळी (वय २१, रा. भिरडई, ता. जि. धुळे)
विदुर ऊर्फ विजय देवा जाधव (वय ४०, रा. वसंत नगर, ता. पारोळा, जि. जळगाव)
यांना ताब्यात घेतले आहे.
यूट्युबवरून घेतले चोरीचे प्रशिक्षण
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यूट्युबवर एटीएम मशीन चोरीबाबतचे व्हिडीओ पाहून पद्धती शिकल्याची कबुली दिली. चोरीसाठी दि. ९ जानेवारी रोजी पिकअप वाहन खरेदी करून साखळी, दोरखंड व इतर साहित्य आणल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिरपूर व्यतिरिक्त धुळे व अमळनेर येथेही अशाच प्रकारे एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघड झाली आहे.
सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करून त्यांच्याकडील पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
