लोकमान्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला मानाचा सन्मान; न.पा. शिक्षण सभापती शेख नविद यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीस वितरण..

अमळनेर : आबिद शेख
अमळनेर शहरातील लोकमान्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी शेख नविद अहमद मुशिरोदीन यांची अमळनेर नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून नवनिर्वाचित सभापती शेख नविद यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना शेख नविद यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत लोकमान्य विद्यालयाने दिलेल्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख केला. “या शाळेने मला केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही, तर सामाजिक जाणीव, शिस्त आणि नेतृत्वाची दिशा दिली. आज याच शाळेचा विद्यार्थी म्हणून नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत व नाट्यछटांनी उपस्थितांची मने जिंकली. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेख नविद यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षण सभापती शेख नविद यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शेख नविद यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्नेहसंमेलनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
