संत निरंकारी समागमासाठी विशेष रेल्वे गाडीने भाविक रवाना; खासदार-आमदारांनी दाखवली हिरवी झेंडी..
आबिद शेख/अमळनेर
जळगाव | दि. २३ जानेवारी २०२६ :
प्रेम, सेवा आणि एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९वा संत निरंकारी समागम येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सांगली येथे परमपूज्य सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता

रमितजी यांच्या दिव्य सान्निध्यात भव्य व श्रद्धामय वातावरणात संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय आध्यात्मिक सोहळ्यासाठी खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भाविक, श्रद्धाळू व सेवादार सांगलीकडे रवाना झाले आहेत.
या समागमासाठी भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. श्री. हिरालाल पाटील (क्षेत्रीय प्रभारी, धुळे झोन ३६-बी) व समस्त साधसंगत यांच्या प्रेरणेने तसेच माननीय खासदार रक्षा खडसे (केंद्रीय राज्यमंत्री) यांच्या अथक प्रयत्नांतून दि. २३ जानेवारी रोजी ही विशेष गाडी सुरू करण्यात आली.
भुसावळ रेल्वे स्थानकावर नामदार मंत्री संजयजी सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे, श्री. पुनित अग्रवाल (DRM), भालेराव साहेब (स्टेशन इंचार्ज), भुसावळ शाखेचे मुखी सुरेशजी, संचालक रतन परदेशीजी, आबा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रेल्वेगाडीस हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
तसेच जळगाव रेल्वे स्थानकावरून खासदार स्मिता ताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, राजकुमार वाणीजी (ब्रह्मज्ञान प्रचारक), रमेश कुमार आहुजाजी (संयोजक) तसेच जळगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी राजकुमार वाणीजी यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली.
या विशेष रेल्वेगाडीचा लाभ जवळपास २,००० भाविकांनी घेतला. मार्गातील पाचोरा व चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर लोको पायलटचा सत्कार करण्यात आला.
हा दिव्य संत समागम सांगली शहरालगत सांगलवाडी परिसरातील सुमारे ४०० एकरांच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. दररोज दुपारी २.३० वाजता मुख्य सत्संगास प्रारंभ होणार असून देश-विदेशातून आलेले संत, वक्ते, गीतकार व कवी आपल्या विचारांद्वारे व सादरीकरणातून ईश्वर-परमात्मा व सद्गुरूंप्रती श्रद्धा व्यक्त करणार आहेत. प्रत्येक दिवसाचा समारोप रात्री ९ वाजता सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या प्रेरणादायी आशीर्वचनांनी होणार आहे.
यंदाच्या प्रादेशिक संत समागमासाठी ‘आत्म-मंथन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून आत्मबोध, आत्मशुद्धी व मानवी मूल्यांच्या जागृतीचा संदेश या समागमातून दिला जाणार आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी निवासी तंबू, भव्य लंगर व्यवस्था, कॅन्टीन, औषधालय, सुरक्षा यंत्रणा, नियोजित वाहनतळ तसेच रेल्वे व बस स्थानकांहून ये-जा करण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात स्वच्छता व सुव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
