वावडे गावात एकाच रात्री सात घरफोड्या; १.५५ लाखांचा मुद्देमाल लंपास..

0
New-Doc-01-23-2026-10.26.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील वावडे गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री सात बंद घरांचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून सुमारे १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, देविदास बारीकराव पाटील (वय ४४, व्यवसाय BSF जवान), मूळ रा. वावडे ता. अमळनेर हे सध्या पश्चिम बंगाल येथे सेवेत असून रजेवर चोपडा येथे आले असताना दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी त्यांच्या वडिलांना नातेवाईकांकडून घरफोडीची माहिती मिळाली. त्यानंतर देविदास पाटील यांनी वावडे येथील घरी जाऊन पाहणी केली असता घराचे कुलूप, कपाट व पेटी फोडलेली आढळून आली.
तपासणीदरम्यान त्यांच्या घरातून ३० ग्रॅम सोन्याची पोत (किंमत ३६ हजार) व २५ हजार रुपये रोख, असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच गल्लीत राहणाऱ्या इतर नागरिकांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला.
घरफोडीचे बळी ठरलेल्यांमध्ये
राजेंद्र पुंडलीक पाटील – २५ हजार रुपये रोख
दिनेश मच्छींद्र पाटील – ७ भार चांदी व २० हजार रुपये रोख (एकूण २६ हजार)
प्रदीप तोरण पाटील – ५ ग्रॅम सोन्याची पोत व १७ हजार रोख (एकूण २२ हजार)
रतीलाल अमृत पाटील – सोन्या-चांदीचे दागिने व १५ हजार रुपये रोख (एकूण २१,५००)
यांचा समावेश आहे. तसेच जितेंद्र रमेश वैष्णव व अरुण ढोमण पाटील यांच्या घरांचे कुलूप फोडण्यात आले असले तरी त्यांच्या घरातून काहीही चोरीस गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सदरची चोरी दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १२.१५ ते सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज असून अज्ञात चोरट्यांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed